Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |

संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर
डासांच्या त्रासामुळे हैराण झाले असताना आयएएस असणारे पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील हे गप्प का?ते निर्णय का घेत नाहीत असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी विचारला असून निर्णय लवकर घेत चला अन्यथा शहरातील पदाधिकारी तुमच्या अंगावर येथील अशी भिती भापकर यांनी व्यक्त केली आहे.

जाग्यावर निर्णय घेणे अपेक्षित?
पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुठा या तीन नद्या वाहतात.या तिन्ही नद्यांच्या पाण्यावर जलपर्णीने पांघरून घातले आहे.जलपर्णीच्या वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या डासांमुळे पिंपरी चिंचवडकर पुरते हैराण झाले आहेत. शहरातील सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक इत्यादी अनेक निवेदने देऊनही पालिका प्रशासन कारवाई करीत नाही म्हणूनच शिवसेनेचे नवनिर्वाचित शहरप्रमुख व नगरसेवक सचिन भोसले यांनी महापालिकेच्या सभेच्या दिवशी जाम राडा घातला होता.माजी महापौर राहुल जाधव यांनी भरसभेत जलपर्णी ठेकेदाराची अरेरावी सांगणारी क्लिप वाजवून दाखविली तरीही पालिकेचे अधिकारी वाढलेल्या जलपर्णी कडे गांभीर्याने पाहत नाहीत हे लक्षात आल्यावर शेवटी परवा सत्ताधारी पक्षाचे महापौर माई ढोरे,उपमहापौर हिराबाई घुले,पक्षनेते नामदेव ढाके,स्थायी समिती सदस्य बापू काटे इत्यादीनी आयुक्त राजेश पाटील यांच्यासह जलपर्णीने वेढलेल्या नद्यांना भेटी दिल्या.जलपर्णीने झाकलेली नदी पाहिली,डासांच्या उत्पत्तीने हैराण नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या तरीही आयुक्त राजेश पाटील गप्प का ? त्यांनी निष्क्रिय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय यांना जाग्यावर निलंबित करणे गरजेचे होते.जलपर्णी व डासांच्या तक्रारी वाढत असताना व पालिकेचे नगरसेवक आक्रमक होऊन जर संबंधित अधिकारी गांभीर्याने काम करीत नसेल तर अश्या अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई होणे क्रमप्राप्त होते मात्र आयुक्त राजेश पाटील यांनी तसे काहीही केले नाही.ते अजून कोणाची व कशाची वाट पाहत आहेत!

रॉय यापूर्वीच का निलंबित झाले नाहीत?

पिंपरी चिंचवड महापालिकेचे काही अधिकारी महापालिकेचे “जावई”असल्यासारखे वागत आहेत.ते कसेही वागले,कितीही मोठा भ्रष्टाचार केला तरी त्यांचे कोणी “वाकडे”करीत नाही असाच तोऱ्यात वागत आहेत.त्यापैकीच डॉ अनिल रॉय हे एक अधिकारी आहेत.

मशीन खरेदी भ्रष्टाचार, जलपर्णीच्या कामाकडे दुर्लक्ष म्हणून शहर भर ओरड असताना कसलीही हालचाल करीत नसणारे असे अधिकरी पिंपरी महापालिकेला हवेतच कशाला? असा प्रश्न मारुती भापकर यांनी विचारला असून आयुक्त राजेश पाटील यांनी डॉ रॉय यांना त्वरित निलंबित करावे मागणी केली आहे.

आयुक्तांचे नवेपण संपले!
१५फेब्रुवारी २०२१रोजी आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार घेतला.कालच त्यांना दीड महिण्याचा कार्यकाल संपला आहे.आयएएस दर्जाचे राजेश पाटील यांच्यासाठी व पिंपरी चिंचवड शहरासाठी हा कार्यकाल खूप मोठा आहे.महापालिकेचे अधिकारी,नगरसेवक,पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते यांची बऱ्यापैकी ओळख झाली असेल.त्यामुळे आता ते नवखे राहिले नसून त्यांनी डॉ अनिल रॉय सारख्या निष्क्रिय, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.अन्यथा महापालिकेचे पदाधिकारी आयुक्त राजेश पाटील यांच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाहीत याची काळजी आयुक्त राजेश पाटील यांनी घेणे गरजेचे आहे.