Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

बापूसाहेब गोरे | पिंपरी |
प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा “एक बार जो मैने कमिटमेंट कर दि,उसके बाद तो मै अपनी आप की भी नही सूनता!”हा दबंग डायलॉग संपूर्ण देशाने ऐकला आहे. असाच एक महाराष्ट्राच्या राजकारणातील “दबंग ” नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे पाहिले जाते.” एक तर मी कुणाच्या नादी लागत नाही,जर का कोणी माझा नाद केला तर मी त्याला असा तसा सोडत नाय” हा त्यांचा डायलॉग व त्या डायलॉग नंतरची अजितदादांची “ऍक्शन” राज्यातील प्रत्येक राजकारणी ओळखून आहेत त्यामुळे अजितदादांच्या नादी सहजासहजी कोणी लागत नाही.त्याची प्रचिती पिंपरी चिंचवडकर घेत आहेत.

राज्यातल्या अनेक नेत्यांच्या विरोधात वक्तव्य केले जातात, आरोप होतात मात्र अजितदादांच्या नादाला लागण्याचं धाडस महाराष्ट्रात कोण करताना दिसत नाही,आणि जो कोणी त्यांच्या नादाला लागेल त्याला त्याची किंमत मोजावी लागल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने पाहिले आहेत.

याचाच प्रत्यय परवा पिंपरी चिंचवड शहरात पहावयास मिळाला.सोमवार दि 5 जुलै रोजी भाजपचे राजेश पिल्ले यांनी कासारवाडी येथील कलासागर या आलिशान हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषदेचा विषय होता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधी पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी सुरू असलेला तपास लवकरात लवकर करावा याची मागणीची माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते.

पिल्ले एकटे पडले…!

राजेश पिल्ले हे भाजपचे दक्षिण भारतीय आघाडीचे संयोजक व पिंपरी चिंचवड भाजप पक्षाचे क्रियाशील सदस्य व पदाधिकारी असल्याने त्यांच्या समवेत भाजपचे शहरातील पदाधिकारी उपस्थित राहतील या अपेक्षेने अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे.शहरात भाजपचे दोन आमदार व महापौर,सत्ताधारी पक्षनेते इत्यादी पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी असताना राजेश पिल्ले यांच्या समवेत पत्रकार परिषदेमध्ये एकही आमदार अथवा पदाधिकारी किंवा पक्षाचा साधा एक कार्यकर्ताही उपस्थित नव्हता. अजितदादांच्या विरोधी पत्रकार परिषद घेताना बिचारे राजेश पिल्ले एकटे पडल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

अजितदादांची दहशत कायम..!

महाराष्ट्रातील भाजपची सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते महाविकास आघाडीवर अक्षरशः तुटून पडतात.काही वेळा राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यावर विविध आरोप केले,अजितदादांच्या विरोधी आरोप, टीका टिप्पणी करण्यात आली मात्र पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक नेत्यांनी अजितदादा पवार व शरद पवार यांच्यावर उघड आरोप केल्याचे ऐकिवात नाही. यावरून पिंपरी चिंचवड शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दहशत असून त्यांच्या विरोधी बोलण्याची धमक कोणामध्ये नसल्याचे सिद्ध होत आहे.

स्थानिक नेत्याबरोबर लागेबांधे..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर भाजपचे अनेक पदाधिकारी हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने अजूनही अजितदादा व राष्ट्रवादी बरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध असून हे नेते एकमेकाविरोधी फक्त आम्ही विरोधक आहोत असे भासवितात मात्र सर्व पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांमध्ये सलोख्याचे सबंध असल्याची चर्चा केली जात असून तू आणि मी सख्खे भाऊ,सत्तेचा मलिदा मिळून खाऊ अशी वृत्ती असल्याचे बोलले जाते.

निवडून कसा येतोस ते पाहतोच…!

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्यांच्या नेहमीच वरचष्मा राहिला आहे.शरद पवार असो व अजितदादा यांनी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील अनेकांना सत्तास्थानी बसवून मोठे बनविले आहेत तर विरोधी पक्ष व विरोधकांवर विजय मिळवत राज्याच्या राजकारणात “लीड” घेतली आहे.त्यापैकीच अजितदादा पवार यांचे एक उदाहरण राज्यभर गाजले होते.पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील विजय शिवतारे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. काही वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व आमदार,मंत्रीही बनले.ते मंत्री बनताना कोणाची रसद मिळाली हा विषय वेगळा आहे परंतु शिवतारे मंत्री झाल्यानंतर पवार परिवारावर बारामती येथे येऊन सडकून टीका करू लागले. त्यांची टीका पवार कुटुंबास जिव्हारी लागली.शेवटी अजितदादानी त्यांचा समाचार घेण्याचे ठरविले व ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलले ‘ शिवतारे तर काय पोपटा सारखा मिठू मिठू बोलू लागलाय…अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती…तुझा आवाका किती…तू बोलतोस कोणाबद्दल…तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते …अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय,मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाय करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही…आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या …गप्प बसा, गप्प बसा… याचं तर उर भरून आलंय… त्याला काय करू,काय नाय होतंय…आता 2019 ला हा कसा आमदार होतो तेच मी बघणाराय’ असे म्हणत अजितदादांनी त्यांचे जाहीर सभेत दिलेले चॅलेंज पूर्ण केले विजय शिवतारे निवडणुकीत पराभूत झाले. विजय शिवतारे यांच्यासारखी अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यामुळे शरद पवार असतील अथवा अजितदादा यांच्या विरोधी बोलताना अनेक राजकारणी मंडळी दचकतात.त्यामुळेच परवा कासारवाडीच्या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश पिल्ले एकाकी पडले असे सांगितले जाते.