Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी, (दि. ३१)

– पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्र. १२ मधील गृह योजना सोडतीत यशस्वी ठरलेल्या लाभार्थ्यांना सदनिका पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करूण देण्याची मागणी, जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी सदनिका लाभार्थ्यांच्या वतीने ही आग्रही मागणी केली आहे.
आपल्या निवेदनात सिमा सावळे म्हणतात, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्र. १२ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील ४,८८३ सदनिकांच्या वाटपाची सोडत नुकतीच काढण्यात आली आहे. सदर सोडतीत यशस्वी ठरलेल्या नागरिकांना आपण दि. १ ते ३० जून पर्यंत सदनिका किंमतीच्या १० % रक्कम भरण्याचे कळविले आहे. सदर प्रकल्पाचे ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या सदनिका पाहण्यासाठी अनेक लाभार्थी उत्सुक आहेत. रविवार दि. ३० मे २०२१ रोजी अनेक लाभार्थी सदनिका पाहण्यासाठी प्रत्यक्षात जागेवर आले होते. मात्र आपण त्यांना सदनिका बघण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली आहे.
आपले स्वता:चे हक्काचे घर असावे, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. त्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गोरगरीब नागरिकांचे हे आयुष्यभराचे स्वप्नच आहे. बाजारपेठेतून छोटीमोठी वस्तू खरेदी करताना देखील आपण वस्तू निरखून पाहतो. इथे आयुष्यातील स्वतःचे घर घरेदी करताना ते कसे आहे याची पाहणी करता येऊ नये याची या नागरिकांना खंत आहे. सोडत काढण्यापूर्वी प्राधिकरणाने सदर ठिकाणी नमुना सदनिका (Sample Flat) बघण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या. परंतु सोडत काढल्यावर सदर सोडतीत यशस्वी ठरलेल्या लाभार्थ्यांना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सदनिका बघण्याची उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे. प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याने सदनिका बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो याची मला जाणीव आहे. परंतु सोडतीत यशस्वी ठरलेल्या नागरिकांची सदनिका पाहण्याची इच्छा देखील रास्त आहे. खासगी बिल्डर देखील खरेदीदाराला सदनिका दाखविण्याची व्यवस्था करतात. इथे प्राधिकरणाने लाभार्थ्यांना सदनिका दाखविली पाहिजे, अशी आग्रही मागणी सिमा सावळे यांनी केली आहे.
सदनिका पाहण्यासाठी टोकन पद्धतीने अथवा इतर सोयीस्कर पद्धतीने परवानगी द्यावी, मात्र स्वप्नातले स्वतःचे घर कसे आहे याची पाहणी करण्यापासून या नागरिकांना रोखू नये, अशी विनंती जेष्ठ नगरसेविका सिमा
सावळे यांनी निवेदनातून केली आहे.